Wednesday, June 8, 2011

मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट

मुक्तांगण काय आहे हे मला माहित नव्हते. खुपते तिथे गुप्ते मध्ये अनिल अवचट आले होते एका भागात तो भाग मी पहिला आणि इतर कामात डोक्यातून गेलादेखील. पण सुट्टी चालू झाली आणि काहीतरी नवीन छान वाचावे म्हणून सगळी पुस्तके धुंडाळली तेव्हा हे पुस्तक हातात पडले. समकालीन प्रकाशनाचे. युनिक फीचर्स ची बरीच पुस्तके खरेदी केली त्यातले हे एक. पुस्तक पहिले आणि म्हटले बघू आहे तरी काय. आणि जेव्हा प्रस्तावना वाचली तेव्हाच ठरवले कि हे अजब आहे आणि ते वाचलेच पाहिजे. आणि जसजशी मी वाचत गेले मी आश्चर्य चकित झाले कि हे शक्य आहे. मी कधी कुणा व्यसनाधीन माणसाला पाहिले नव्हते. पण कधीमधी रस्त्यात बाजूला वाकडी तिकडी पडलेली माणसे पहिली आहेत. कधीच मी त्या लोकांचा विचार केला नव्हता. पण पुस्तक वाचताना जाणवले कि आता बास शिक्षण पूर्ण झाले कि आपण तिथे निदान आठवड्यातले सुट्टीचे दिवस तरी जायचेच.
पण पुस्तक जसजसे पुढे गेले आणि एकेठिकाणी मला जाणवले कि हे माझ्यासारख्या मुलीला कधीच शक्य नाही. ते अनिल अवचट ( बाबा ) आणि त्यांच्यासारख्या इतरांनाच शक्य.
ह्या पुस्तकाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य असे कि ते वाचताना आपण तिथे मुक्तांगण मध्ये पोहोचतोच. मी हे पुस्तक वाचताना मुक्तांगण मध्ये गेले तिथल्या 'त्या' पेशंटना देखील पाहून आले. मुक्तांगणची गोष्ट आपण वाचत नाही तर आपण ती ऐकतो आहोत हि भावना वाचणा-याच्या मनात निर्माण होणे ह्यामध्ये लेखकाचा खूप मोठा विजय आहे असे मला वाटते.
एखादी व्यक्ती जर एकच गोष्ट वारंवार करत असेल तर आपण चिडतो, वैतागतो, आदळआपट करतो. पण जेव्हा आपण समजावलेला, आपले ऐकून काही काल शांत, निवांत आयुष्य जगणारा माणूस पुन्हा त्या व्यसनाच्या काळ्या डोहात जातो, बुडतो तेव्हा त्या माणसाने किती चिडावे? पण मुक्तांगणचा बाबा, तिथल्या प्रत्येक मुलाचा बाबा असे काही करत नाही तो शांत राहतो. त्या मित्राकडून वचन घेतो पुन्हा असे न करण्याचे आणि बाबा मागतो म्हटल्यावर तो मित्र देखील वचन देतो. आणि बहुतेक बाबाला दिलेला शब्द पाळतात. खरेच बाबा तुमच्या कार्याला सलाम.
बाबा म्हणतो, ' ह्या सा-याचे credit सुनंदाचे आहे. तिने चालू केले ते आणि तसेच पुढे नेण्याचे काम मी केले.' सुनंदा म्हणजे बाबांची पत्नी. डॉ. सुनंदा (अनिता) अवचट. सा-या मुक्तांगणच्या मॅडम अहं लाडक्या मॅडम. पेशंट इतर कुणाचेही नाही ऐकले तरी मॅडमचे नक्की ऐकणार तशी हातोटीच होती मॅडमची. मुक्तांगण आपल्या स्वत:च्या नवीन इमारती मध्ये हलत असतानाच कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यावेळेपर्यंत त्यांना एवढे यश आले होते कि त्या गेल्या नंतर दु:खाचा एवढा अतिरेक होऊनही त्यांचा एकही पेशंट परत व्यसनं कडे नाही वळला. मॅडमनी केवळ पेशंटना व्यसनमुक्तच नाही तर एक चांगला माणूस देखील बनवले. किंबहुना मुक्तांगण चालू करताना हेच ध्येय होते त्यांचे कि प्रत्येक व्यसनाधीन माणसाला एक चांगला जबाबदार नागरिक बनवायचे. आणि ते काही अंशी पूर्णही झाले.
मुक्तांगणची गोष्ट वाचल्याने मी एक गोष्ट शिकले की स्वत:वर, स्वत:च्या रागावर संयम ठेवायचा. निदान तसा प्रयत्न तरी करायचा कधीनाकाधी सफल होऊच ना. आणि जर पुस्तक वाचणारा प्रत्येक जन हे करू शकला तर जगात शांतता का नाही येणार. तेव्हा जरूर वाचावे असे आहे मुक्तांगणची गोष्ट.








No comments: