Monday, June 15, 2009

तू

’तू’ एक कोडे
अत्यंत क्लिष्ट, अवघड असे..
’तू’ एक गूढ सत्य
कधीही न समजणारे..
’तू’ एक साठा
वेदनेचा, दु:खाचा, सहनशीलतेचा..
’तू’ पाण्यासारखा
सर्वात मिसळणारा...
’तू’ सागरासारखा
सर्वांना सामावून घेणारा..
’तू’ माझा मित्र
मला समजून घेणारा..
’तू’ माझा भाऊ
माझे लाड करणारा...
’तू’ माझा बाबा
माझी काळजी करणारा..
मला सांभाळून घेणारा...
माझ्यासारखाच ......
’तू’ माझा बाबा....

Friday, June 12, 2009

स्वामी - रणजित देसाई

स्वामी ...... कथा नाही ; चरित्र , एका योद्ध्याचे ज्याने प्राणपणाने मराठेशाही जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

हे चरित्र आहे त्या आत्यंतिक पराक्रमी पेशव्याचे ; श्रीमंत माधवराव पेशवे अर्थात थोरला माधवराव पेशवा.

मराठी इतिहासातील एक परिपूर्णत्वाच्या जवळ पोहोचलेला योद्धा.

एक उत्कॄष्ट योद्धा परंतु ज्याची जवळ्पास सारी कारकीर्द घरची दुही मिटवण्यातच गेली.

एक कर्तव्यदक्ष पुत्र परंतु तितकाच कर्तव्यदक्ष राज्याकर्ता त्यामुळे एक कर्तव्यदक्ष परंतु तरिही अपेशी मुलगा.

एक कर्तव्यदक्ष राज्यकर्ता परंतु सतत नातलगांकडूनच दुखावला गेलेला.

आणि एका मुलाचे, एका पेशव्याचे कर्तव्य बजावताना मनात असूनहि कुठेतरी मागे पडलेला एक निष्ठावान पती.

वयाच्या सोळाव्या वर्षी काकांचा पाठिंबा लाभेल ह्या विश्वासाने पेशवाईची वस्त्रे स्वीकारून पेशवेपद समर्थपणे सांभाळणारा ह्या राज्यकर्त्याला आयुष्य मात्र दैवाने फारच कमी लाभले.

उणेपुरे २७ वर्षे वय असतानाच राजयक्ष्मासारख्या दुर्धर रोगाने त्या थोर पेशव्याचा मृत्यु झाला. आणि त्याच्या निष्ठावान, पतिव्रता स्त्रीने त्यांच्या पत्नीने सती जाऊन आपला देखील शेवट पतीसोबत करुन घेतला.

त्या थोर पेशव्यास आणि त्याच्या थोर पत्नीस कोटि कोटि प्रणाम.