Saturday, August 4, 2018

हृदयांशु || भाग - ०१

"ए ऐक गं, उद्या तुझा एक मित्र येणारे तुला भेटायला. सकाळी ठीक १० वाजता येईल तो. ब्रेकफास्टला येणारे पण आपण त्याला जेवायलाही थांबवून घेऊ. तयारीला लाग."
"कोण मित्र?" हे राहीच्या तोंडून आलेले शब्द ऐकायला रंगा तिथे थांबलाच नव्हता. तो कधीचाच त्याच्या त्याच्या बेडरूममध्ये जाऊन झोपला होता.
'हं. कोण मित्र येणारेय माझा? आणि माझ्या कोणत्याही मित्राबद्दल ह्याला कसे माहिती?'
ह्याच विचारात थकल्या भागल्या राहीला झोप लागली.
सकाळी लवकर उठली. स्वतःचे आवरून ती रंगा उठायची वाट बघत बसली. रंगा उठल्यावर त्याच्यासाठी चहा केला.
"आज कोण येणारेत आपल्याकडे?" भीतीमुळे राहीच्या तोंडून आवाज नीट फुटत नव्हता. 
"कोण काय कोण? काल सांगितलं तेव्हा लक्ष कुठे होतं? तुझा मित्र येणारे" पराकोटीच्या तुसडेपणानी रंगा ओरडला.
"ख..ख..खायला क क क्काय करू?" घाबरलेल्या राहीला नीट बोलताही येत नव्हते.
"कांदेपोहे कर. आणि भज्या तळ. आणि हां गोड .. शिरा कर."
"बर."
पोह्यासाठी भरपूर कांदा चिरुन ठेवला. 
'कित्ती दिवसात असे मस्त कांदेपोहे केलेच नाहीयेत आपण. शीत्ला काकी काय मस्त पोहे बनवते. ती म्हणते मन लावून केलं की स्वयंपाक रुचकर होतो. आज आपणही मन लावून करु स्वयंपाक. आपल्यासाठी म्हणून करु. आता भज्यांसाठी कांदा चिरावा. खेकडा भजी करुयात. आज्जीसारख्या. मस्त लांबच लांब कांदा चिरायचा. एकसारख्या पण कमी जाडीचा. त्या आपल्या अंदाजानी तिखट, मीठ आणि चिमुटभर साखर घालायची. आणि द्यायचे ठेवून बाजूला. आता ह्या कांद्याला पाणी सुटेल. तोपर्यंत शिऱ्याची तयारी करुन घेऊ. पहिले एका कढईत तूप घ्यायचे. त्यावर दोन वाटी रवा घेतलाय आपण तो भाजून घ्यायचा. छान गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजायचा.' 
नाष्ट्याची तयारी करता करता राही आपला लहानपणीचा खेळ केव्हा खेळू लागली कळालेच नाही. ती आणि नीरजा लहानपणी उगीचच खाना-खजाना खेळत असंत. 
" काय हे? अजून तू पोहे केले नाहीएस? भज्यांचा पत्ता नाहीये. शिरा व्हायचाय? काय चाल्लंय?"
रंगाचा हा असा ओरडल्यानी राही एकदम दचकली. 
"मी .. ते.. तयारी.. तयारी करतेय." 
"अजूनी तयारीच का? कधी व्हायचं हे सगळं? वेळेवर सगळं तयार नाही ना झालं तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही. काय?"
"हो"
"आणि जरा बरी साडी नेस. फार मेकअप नकोय."
"हो"
"पुढच्या अर्ध्या तासात आवरून तयार असली पाहिजेस." 
" "
"काय सांगतोय मी? कळतेय का काही??"
"हो ... हो... मी... मी आवरते."
रंगा तिथून गेल्यावर एक ग्लासभर पाणी गटागटा प्यायली राही. आताशा त्याच्या ह्या अश्या आरडा ओरडीचे तिला काहीच वाटत नव्हते. सुरुवातीला ती ढसढसा रडत असे. पण आता तीला ह्या साऱ्याची सवय झालेली. मनातले विचार झटकून तिनी पटापटा पोह्यासाठी फोडणी करुन ठेवली. तळणीसाठी तेल तापत ठेवले आणि शिरा वाफवायला ठेवला. आणि ती पटकन् स्वतःचे आवरायला पळाली. 
'काय घालावे बरे? चुडीदार की साडी?' असा विचार करताना जीभ चावली.
'मूर्ख. मंद. अक्कलशून्य मुली. विसरलीस ना? काय सांगितलेय तुला? साडी नेस. काय नेस? साडी. कुठली नेस ते का सांगितला नाही नालायकानी? xxxxx'
राहीने छानशी मरुन रंगाची रंगाची सिल्कची साडी काढली बॅगमधून. ही साडी. बाबांनी घेतलेली. लग्नाच्यावेळी साखरपुड्याला नेसायसाठी. 
"अगं, ती साडी बघ शारदा ग्रीन कलरची. ओ दाखवा हो ती साडी. ती नाही हो ती त्याच्या खालची. नाही नाही ती वरची. ओ ती नव्हे. शी काय बाई ही अशी साडी घेऊ का आम्ही? ती हो हा त्याच्या वरची ती दुसरी. हा हीच ती. बघ गं राही. ही साडी." नमूमावशी उत्साहानी दाखवत होती.
"नाही नको. मला नाही आवडला हा कलर."
"अगं मग ही बघ. मस्त गुलबक्षी रंगाची." इति सविता काकू.
"नको हा वहिनी. त्याचे काठ बघा. काळेयत." शुभदा काकी म्हणाली.
"आपल्या लेकीच्या लग्नात काळं नको बाई."
"राही" आईचा खास ठेवणीतला आवाज. "ही बघ गं आवडतीय का? गडद हिरव्या रंगाची. काठ छान आमरशी रंगाचे आहेत बघ."
"नको." राहीने नाक मुरडले.
"मग ही बघ मरुन कलरची. त्याला छान गोल्डन काठ आहेत बघ." नीरजाला माहिती होते राहीचा फेवरेट कलर आहे मरुन.
"अं. नको हीपण नको"
असे करत राहीसमोर साड्यांचा हा ढीग जमा झाला. 
शेवटी ज्या ज्या कोणत्या आधी दाखवल्या होत्या त्याच खरेदी करुन आले. 
"काय गं राही उगीच एव्हढा वेळ घालवलास. आधीच घ्यायच्या ना ह्या साड्या."
"अहो वहिनी, आपल्या राहीचं माहितीय की आपल्याला. नेहेमी कन्फ्युज्ड असते. आधी नाही म्हणणार मग हो म्हणणार."
"खाण्याच्या बाबतीतही असेच. मानानी खाणार नाही."
"कसं व्हायचं गं येडु तुझं??"
एक साडी बघून राही आठवणींमध्ये रमून गेली.
"काय आवरलं का नाही?" खालून आवाज आला तशी ती भानावर आली. 
पटकन साडी नेसली. लांबसडक केसांचा मानेवर अंबाडा घातला. गळ्यात मंगळसूत्र होतेच. कानात आज्जीच्या कुड्या. सैल होणारे ब्लाऊज तिनी आतून सेफ्टीपीन लावून घातलेले. 
पटकन खाली आली. रंगानी तिला बघून न बघितल्यासारखे केले. ती स्वयंपाकघरात गेली. प्लेट्स घेऊन ठेवल्या. घरात एक छान ठेवणीतला असावा अश्या सहा कप-बश्यांचा सेट होता. तो काढून ओल्या कपड्याने पुसून ठेवल्या. तेव्हढ्यात बेल वाजली आणि राहीच्या छातीत धडधडायला लागले. 
'कोण मित्र असेल?'
ती चटकन बाहेर जायला वळली. पण रंगा परत ओरडायचा म्हणून ती तिथेच थबकली. 
रंगानी दार उघडून आलेल्या पाहुण्याचे हसतमुखाने स्वागत केले. 
"अगं, ते आले बघ."
रंगाची हाक ऐकू आली, तशी राहीने साडीवरुन, चेहेऱ्यावरुन, केसावरुन हात फिरवला.
'दारात कोण मित्र उभा असेल?' तिची उत्सुकता शिगेला पोचली.
बाहेरच्या खोलीत जाऊन तिने दारातल्या 'त्या' मित्राला बघितलं आणि ती तिथेच थिजून उभी राहीली.
"Hi राही! कशी आहेस?"
दारात उभ्या हृदयांशुला पाहून राही एकदम आश्चर्यचकीत झाली.


©ज्ञानदा अजित कुलकर्णी