Monday, October 22, 2018

हृदयांशु || भाग - ०५

"जय, तुम्ही निघून गेलात आणि  राहीला तिची चूक जाणवली. पण ती चूक दुरुस्त करणे तिला आता शक्य नव्हते. तुम्ही कुठे आहेत माहिती नव्हते. तुमचा फोन नंबर नव्हता. मेल करून अश्या गोष्टी बोलणे तिला पटत नव्हते. त्या काळात खूप रडली ती. खूप दुःखी, उदास असायची. स्वतःचाच राग यायचा तिला. आणि हे सगळे ती फक्त माझ्याजवळ बोलू शकत होती. साधारण एक- दीड वर्ष झाले असेल तुम्ही तिच्यापासून लांब जाऊन, आणि घरच्यांनी तिच्या मागे लग्नासाठी लकडा लावला. तिला कुणी आवडते का असेही विचारले. आणि वेडाबाई हो म्हणून बसली. मग घरच्यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. कोण आहे, काय करतो, नाव काय, आपल्यापैकी आहे का नाही; एक ना दहा. शेवटी मी मध्ये पडले आणि वेळ मागून घेतला तिच्यासाठी. घरचे सहा-आठ महिने थांबले आणि परत लग्नासाठी विचारू लागले. पण तेव्हा बाई सावरलेल्या होत्या थोड्या. तिने मुले बघायला होकार दिला. पण येणाऱ्या प्रत्येक मुलाची ती तिला आवडणाऱ्या मुलाशी तुलना करायची आणि नकार कळवायची. साधारण एक वर्षभर असेच गेले खूप स्थळं आली आणि गेली. मी तिला खूप समजावले पण तिच्या मनातून 'ती' व्यक्ती काही जात नव्हती. खूप चांगली चांगली स्थळे नाकारली हो पोरीने. माझ्या नवऱ्याचे स्थळ आधी तिलाच आले होते. वेडी आहे पोर. एक दिवस तिच्या मोठ्या काकांच्या कुणा मित्राने एक स्थळ सुचवले. मुलगा इंजिनियर आहे. परदेशी असतो. एकुलता एक. भलतेच भाळले तिचे काका ह्या स्थळाला. तो मुलगा त्यावेळी परदेशीच होता म्हणे. त्याने तिच्याशी बोलायचे आहे म्हणून सांगितले. दोघे फोनवर बोलायचे. Skype वरून चॅटिंग चालायचे. का माहिती नाही पण तिलाही तो बरा वाटला होता. व्हिडीओ कॉलपर्यंत गेले होते. घरच्यांना भेटणे झाले होते. लग्न जवळपास ठरलेच होते. जवळपास काय ठरलेलेच. साखरपुड्याची तारिखपण निघाली. तो २ दिवस आधी येणार होता साखरपुड्यासाठी. पण अचानक रद्द झाले त्याचे येणे. पण काढला मुहूर्त कसा चुकवायचा म्हणून ऑनलाईन साखरपुडा केला तिच्या घरच्यांनी. लग्नाची तारीख २ महिन्यानंतरची निघाली. 
एकदा त्याने तिला सांगितले कि तो एका कॉन्फरन्सला म्हणून मुंबईला येणार आहे. आणि त्याची इच्छा होती की तिने त्याला भेटावे. पण तो फक्त एकाच दिवसासाठी येणार होता आणि त्याने घरी सांगितले नव्हते. आणि त्याची इच्छा होती कि तिनेही घरी काहीच सांगू नये. म्हणून मग मी आणि ती आम्ही दोघी माझे काहीतरी काम आहे असं सांगून मुंबईला गेलो. मोठ्या आलिशान पंचतारांकित हॉटेलात थांबला होता तो. तिथंपर्यंत मी तिला सोबत केली पण तिथून पुढे ती एकटीच गेली. ती जेव्हा परत आली तेव्हा ती प्रचंड रडत होती. काय झाले नाही माहिती."
"तुलाही?"
"हो मलाही नाही सांगितले तिने."
"पण मला माहिती आहे."
"काय? तुम्हाला? पण कसे?"
"कारण त्यावेळी मी तिथेच होतो."
" "
"मी तेव्हा तिथेच त्याच हॉटेल मध्ये होतो. जे झाले ते मी पाहिले होते. त्यांच्यात काय बोलणे झाले नाही माहिती पण जे झाले ते हिरासाठी भयंकर होते."
"हिरा?"
"मी तिला हिरा म्हणतो."
" "
"बाहेर प्रचंड पाऊस कोसळत होता. अश्या पावसात हिराला आवडते"
"चहा आणि भजी"
"बरोब्बर. पण त्या मुलाने मागवली होती रम आणि फ्राईड फिश"
"shitt"
"हिरा खूप अस्वस्थ होती. त्यांच्यात बोलणे चालले तेव्हा प्रचंड चलबिचल होत होती तिची. नंतर एक मुलगी आली." 
" "
"त्या मुलाच्या मांडीवर बसली. किसिंग आणि बरेच प्रकार झाले त्यांच्यात."
"व्हॉट?"
"हो. नि तेही हिरासमोर."
" "
"हिरा खूपच बेचैन होती गं. डोळ्यातल्या आसवांना कसेबसे थांबवले होते तिने. शेवटी निघाली तिथून. बाहेर पडली ती रडत रडतच."
"हे खूप भयंकर आहे.आणि मग तिनेच नकार दिला लग्नाला. किती बोलले आहेत तिला सगळे. तिचे काका, काकू, आत्या सगळेच. त्या मुलाच्या घराचे तर केव्हढे बोलले. तिच्या चारित्र्यावरदेखील संशय घेतला त्यांनी. तरीही हि मुलगी एक अक्षरदेखील बोलली नाही."
"पण हे लग्न तर मोडले. मग श्रीरंग इनामदार? त्यांच्याशी लग्न कसे आणि कधी झाले?"
"सांगते सगळं सांगते. हे लग्न मोडल्यावर तिला सगळी घाणेरडी स्थळे यायला लागली. घटस्फोटित, विधुर, व्यंग असलेली."
"भयंकर, काय गं आपला समाज. मुलीचे लग्न मोडले कि ती इतकी वाईट होते का गं?"
"हं. ह्या अश्या स्थळात तिचे ४-६ महिने गेले. पोर पार कोमेजलेली. तिचा सगळा आत्मविश्वास संपला होता. अश्यातच तिच्या मावशीने एक स्थळ आणले. सगळे सेम होते. मुलगा परदेशात. त्याला एक बहीण होती. तीदेखील परदेशातच. दिसायलाही मुलगा स्मार्ट होता. आणि हिच्या मोडलेल्या लग्नाशी त्यांना काहीही आक्षेप नव्हता. हाच तो श्रीरंग इनामदार. पण त्याच्यासोबत मात्र हीच रीतसर कांदापोहे कार्यक्रम झाला. त्याला हि बघताक्षणीच आवडली. आणि त्याच्या आईवडिलांनी लगेच होकार सांगितला. लग्न मोडले म्हणून आता राहीला काहीच अधिकार नव्हता होकार-नकार सांगण्यात. आणि हे लग्न ठरले. दोन महिन्यात लग्न झाले आणि राहीबाई उडाल्या बुंग."
"नीरजा, ह्या काळात तुझा श्रीरंगशी किती परिचय झाला? किती संपर्क होता?"
"श्रीरंगशी संपर्क फारसा नव्हताच. पण तो माणूस खूप चांगला वाटलं मला. बोलायला, वागायला. caring वाटला. त्यावेळी मी प्रेग्नंट होते. तेव्हा मी. तिला वेळंच नाही देऊ शकले."
"हिरा इकडे आल्यानंतर तुमचे काय बोलणे झाले? किंवा काय बोलणे होते?"
"राही आणि मी फार क्वचित बोलतो. व्हिडिओ कॉल नाही होत आमचा. फेसबुकवर फोटो पण नसतात. बघितलेच नाहीये मी तिला लग्नानंतर. फोनवर पण जुजबी बोलते मी मस्त ठीक तू बोल ग कशीयेस. आणि मग मी काय सुटतेच. मी, माझा नवरा, माझा मुलगा, माझा संसार. हेच बोलतो आम्ही. तिच्याबद्दल आम्ही कधीच नाही बोललो. आम्ही बोललोच नाहीये तिच्याबद्दल. आणि हे आतल्या लक्षात येतेय माझ्या. कशीये हो माझी राही?"
"नीरजा, हिरा ठीक नाहीये. अगं साडी नेसली होती आज. अगदीच काडी झालेय गं. मलापण तिच्याशी बोलायला नाही मिळाले. श्रीरंग चे तिच्याशी वागणे मला खूप खटकले. ती मोजून १० शब्द देखील बोलली नसेल माझ्याशी. राहवेना मला. नीरजा हिरा संकटात आहे असे वाटतेय मला. म्हणून तिच्या लग्नाची गोष्ट तुला विचारायला मी तुला मेसेज केला."
" "
"नीरजा?"
" " 
"नीरजा? हॅलो?
" "
"नीरजा? तू रडतेयस? नको रडू अगं. तू आणि मी असे रडलो तर हिराला ह्यातून बाहेर कोण काढणार? Be Strong. Be Brave. Be Fearless. Be positive."
"हो जय, पण अशी कशी मी? ती एवढी संकटात आहे आणि मला कधीच कळाले नाही."
"नीरजा"
"हो मी आहे तुमच्यासोबत. तुम्हाला काय लागेल ती मदत मी करेन. मी तिच्या घरी जाऊन जरा अंदाज घेते तिच्या बहिणींशी बोलून. आणि त्याच्या घरी काही माहिती लागते का हाताशी ते बघते."
"वाह! हेच हवे मला. मीदेखील प्रयत्न करतोय. आपण दोघे लवकरात लवकर तिला ह्यातून बाहेर काढू."
"नक्कीच."
" "
"जय, वाजलेत किती तिकडे?"
"आत्ता पहाटेचे ५.३० वाजलेत."
"का गं?"
"तुम्ही आत्ता जागे?"
"हा. हो अगं. झोप लागत नाही."
"समजू शकते मी."
" "
"जय, जागी तर तीसुद्धा असणारे आज."
"कशी काय?"
"हो. तुम्हाला भेटल्या नंतर ती शांत झोपूच शकत नाही. एव्हढेतर मी तिला ओळखते."
"मग? काही करत येईल का आत्ता?"
"माझ्याकडे श्रीरंगचा नंबर आहे. तिच्याकडे फोन नाहीये. आणि हेसुद्धा आत्ता लक्षात येतेय माझ्या."
" "
"मी श्रीरंग ला फोन करू का?"
"पण त्याने काय होईल?"
"तो वैतागून तिला देईल ना फोन आणि मग आपण कॉन्फरन्स कॉलवर बोलू तिच्याशी."
" "
"प्रयत्न करून बघू."
"मला मिस्डकॉल द्या ८०८५xxxx२४."
"बरं"
एवढ्या रात्री तो रंग्या फोन उचलेल का? आणि उचलला तरी हीराला देईल का? काहीच कळत नाहीये. नीरजा म्हणतेय ती करेल काहीतरी आणि पोहचेल हीरापर्यंत. Let's hope for the best. Be positive Hrudayanshu. Be positive. Relax. Breathe deep. Take a deep breathe. Inhale exhale. Inhale exhale. 


Friday, October 19, 2018

हृदयांशु || भाग - ०४

त्यादिवशी तुला समुद्राकडे जाताना पाहिले राही, असे वाटले की कुणी माझा जीवच काढून घेतेय. धावत-पळत तुझ्याजवळ पोहोचेपर्यंत जीव घश्यात आला होता. खाली आलो तर मॅडम छानपैकी पाय पोटाशी घेऊन समुद्राच्या लाटा पाहात होत्या.
"काय मॅडम, लाटा मोजताय का काय?
"अरे सर तुम्ही? काही काय अहो, लाटा कशा मोजेन मी"
"मग काय करताय इथे एवढ्या रात्री? तेही एकटीच?"
"सांगू?"
" "
"बसा मग खाली. बसा ना"
"हं. बोला"
"मी ना माझ्या बाॅयफ्रेंडशी गप्पा मारणे या."
"बाॅयफ्रेंड?" 'हिला बाॅयफ्रेंड आहे?'
"हो बाॅयफ्रेंड. तो बघा माझा बी.एफ" आभाळाकडे बोट दाखवणारी राही मनमोहक दिसत होती. शेतीतून सुटून चेहऱ्यावर रुळणाऱ्या तुझ्या त्या चुकार बटा. हाय ... तुझ्याकडे नुसते पाहातच बसावे वाटत होते. तु दाखवत असलेला चंद्र आणि तू... तुलनाच नाही काही. तू राही, तू त्या चंद्रापेक्षाही तेजस्वी आणि सुंदर आहेस गं. 
"हं तर हा आहे तुझा बी.एफ?"
"हं हाच तो. पण सर तुम्ही काय करताय इथे एवढ्या रात्री?"
"अगं तुझ्यासाठीच"
"?"
"अगं म्हणजे तुला इथे बघितले एकटीला. म्हणून आलो."
"मला पौर्णिमेचा पूर्ण चंद्र प्रचंड आवडतो."
"हं दिसतो भारीच. आणि मला अशी समुद्राची गाज ऐकायला आवडते."
" "
"अगदी लहानपणापासून बरंका राही, समुद्र पाहून मी वेडावतो. सगळी दुःख, समस्या, टेन्शन्स सगळे विसरायला लावतो.. हा समुद्र."
"मी माझ्या मनातले सगळे शेअर करते, ह्या चंद्राशी. तो ऐकतो माझे सगळे. मन एकाग्र होते. आणि एकचित्ताने विचार केला की सगळ्या समस्या सुटतात."
"असं? मी कधी पर्याय केलं नाही. बघायला पाहीजे."
"नक्की पर्याय करा सर."
"राही, अगं आतातरी बंद कर ना ते सर म्हणणे."
"अं... एक प्रॉब्लेम आहे."
"काय झाले?"
"अं... तुमचे नाव फार अवघड आहे सर. मला तुमचे नावच घेता येत नाही."
"अगं, मग सगळे आॅफीसमध्ये जय म्हणतात. तसे म्हण ना."
"अरे हा, बरे आठवले. अहो, तुम्हाला अॉफीसात जय का म्हणतात?"
" "
"नुसतं हसताय काय सर, सांगा ना"
"अगं, ते मनिषा मॅडम नी दिलेलं नाव आहे." 
"ओ.के. पण का?"
"त्यांचे म्हणणे असे आहे की मी जयसारखा दिसतो."
"कोण जय?"
"अगं, तू वादळवाट सिरियल बघायची सवय का?"
"हो."
" "
"अरे होयकी. माझ्या लक्षातच आले नाही. जयसिंग राजपूत. कस्सला दिसलाय त्यात सुबोध."
"ए, एक सांग ना. मी खरंच तसा दिसतो का गं?"
"हं."
"मग तू पण म्हण ना मला जय"
"नाही. ते काही तुमचं नाव नाही. अं .... हृदय..हृदयांशु. कित्ती अवघड नाव. अं ... मी तुम्हाला अंशु म्हणू? चालेल?"
"म्हण. तुला जे आवडेल ते."
त्या दिवसापासून मला अंशु म्हणणारी तू एकदम नावानी मेसेज कसा केलीस गं?
"अंशु .. हा हेच .. ह्याच नावाने बोलावेन मी तुम्हाला."
"हा..आहेच का? मला अहो-जाहो करायचं कधी बंद करणारेस तू?"
"बघू."
राही अगं त्या दिवशी आपण पहाटे ४ वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. ती रात्र माझ्यासाठी खूप खास होती. त्या एका रात्रीत आपण एकमेकांना असे ओळखायला लागलो तुझ्याच भाषेत बोलायचे तर असं वाटत होते की आपण जणू पहिलीतले मित्रच आहोत.
 अंशु तुझ्या तोंडून ही हाक कित्ती गोड वाटते. असं वाटायचं कि ही हाक फक्त तूच मारावी. आणि हीरा मी नाही दिला तो अधिकार दुसऱ्या कुणालाच. 
पण हीरा काय झालेय तुला? का अशी दिसत होतीस? कधीच कशालाही न घाबरणारी माझी हीरा आज इतकी घाबरून का बसली होती? एक शब्द नीट बोलली नाहीस आज तू. 
मला फेसबुकवर नावाने हाक मारली म्हणजे तुझे फेसबुक अकाउंट तू हॅण्डल करत नाहीस. आज तू खायला शिरा केला होतास म्हणजे तुला माहिती नव्हते कि मी येणार आहे ते. कुठेतरी पाणी मुरतेय. तू खूप मोठ्या संकटात अडकली आहेस. पण कसे कळणार काय झालेय ते? कोण सांगू शकेल मला? तुझ्या घरी कुणाला विचारावे का? नाही तुझ्या घरी तुझ्या ह्या परिस्थिती बद्दल माहिती नसणार. माहित असते तर त्यांनी तुला असे राहूच दिले नसते. मग कोण? तुझ्या मैत्रिणी? हा तुझ्या मैत्रिणीला विचारावे. पण तिला जर माहिती असते तर तिने नक्कीच तुला मदत केली असती. काय नाव तिचे? काहीतरी सांगितले होतेस तू. 
"अरे वाह! बरीच शॉपिंग केलीस कि गं. सगळा पगार इथेच संपवलास कि काय?"
"नाही हो. घरी सगळ्यांना काहीतरी घ्यायला नको का?"
"काय काय घेतलेस ग?"
"मॅडम, फार काही नाही ते घरच्यांसाठी इकडचा थोडा खाऊ घेतलाय."
"मॅडम, तुम्ही काय घेतलेत?"
"मी? काय घेतले असेल?"
"साडी?"
"बरोब्बर. कांजीवरम साडी घेतलीये मी. राही अगं तुपाने घ्यायचीस ना एखादी आईसाठी तुझ्या? किंवा तुझ्याचसाठी घेऊन ठेवायचीस ना लग्नात नेसली असतीस तुझ्या."
"नाही, मी घेतली आहे पण माझ्यासाठी किंवा आईसाठी नाही घेतली."
"मग?"
"माझ्या मैत्रिणीसाठी घेतली."
"बघू ग कशी घेतलीस ते"
"हे बघा. कसा आहे रंग?"
"मस्त आहे गं. मस्तच एकदम."
"हा रंग निरूला मस्त दिसेल. गोरी गोरी आहे ती एकदम. आणि आवडतो पण तिला हा रंग."
निरू. बरोब्बर हेच ते नाव. पण निरू नाव नसेल ना तिचे. काय असेल बरे? निरू म्हणजे नीरजा असू शकेल. किंवा आणखी दुसरे कोणते? आत्ता नीरजा नावाने फेसबुकवर शोधून तरी बघू ना. 
राहीच्या फ्रेंडलिस्ट मध्ये असेल ना ही. म्हणजे मी आहे तर हि असायलाच हवी ना. 
सापडली. हुश्श एकदाची सापडली ही. मेसेज करून ठेवावा. 
"Hi नीरजा, मी हृदयांशु. कदाचित तू मला ओळखत असशील किंवा कदाचित नाही. मी राहीचा मित्र म्हणजे Ex-Colleague. थोडं काम होते तुझ्याकडे."
ही ओळखेल का मला? करेल ना reply? आता फक्त वाट बघणे आहे आपल्या हातात. तोपर्यंत असे नुसतेच बसायचे हातावर हात धरून? नाही असं स्वस्थ नाही बसवणार मला. तिचा नवरा. तो काय करतो? त्याच्या फेसबुक प्रोफाईल मध्ये बघायला हवे. काय बरे नाव त्याचे? श्रीरंग इनामदार. हा सापडला. काय करतो बरे हा? अरे हा तर Andrew च्या कंपनीत काम करतो. Andrew ला विचारायला पाहिजे ह्याच्याबद्दल. 
" Hey Andrew, Wassup?"
"Fine man, how are you doing?"
"M fine. यार थोडा काम था तेरेसे."
"क्या रे?"
"तेरे ऑफिस मे एक आदमी है। श्रीरंग इनामदार नाम है उसका। उसकी जरा information चाहिये मुझे।"
"कैसा information?"
"आदमी कैसा है? क्या काम करता है? ऐसे General information चाहिये।"
"A hmm, give me some time will tell ya."
"hey thanks buddy"
"catch ya later c ya"
"yeah bye"
आता थोडं रिलॅक्स वाटतेय. आता झोप लागेल मला. 
Andrew आणि नीरजाचा रिप्लाय आजतरी काय लगेच यायचा नाही.
कसला आवाज येतोय? अं? मोबाईल? किती वाजलेत? ४? पहाटे ४ला कोण मेसेज करतेय?
"Hey hi अंशु. 
अंशु हेच म्हणायची राही तुमच्याबद्दल बोलताना. 
कसे आहात?
माझी कशी आठवण? 
काय काम आहे माझ्याकडे?"
नीरजा. Yes, She replied. I am so relieved. म्हणजे मी बरोबर जातोय.
"मी ठीक आहे नीरजा.
Please don't misunderstand, but I don't like to be called as Anshu. Sorry, will you please not call me by that name?"
"Yes, sorry.. Hrudayanshu."
"You can call me Jay, as many of my friends call me."
"Yes. Jay. That's easy to call. Anyway whatsup?"
"मला जरा राही बद्दल बोलायचे आहे."
"जय, राहीचे लग्न झालेय आता‌."
"माहिती आहे मला. मी आजच भेटलो तिला."
"काय? कधी? कसा?"
"तिच्या घरी गेलो होतो. तिनेच बोलावले होते."
"राहीनी? I can't believe this. Seriously? She called you? and how she got your contact no.?"
"नीरजा मी सगळं सांगतो तुला. मी फोन करू का तुला?"
"हो कर. फेसबुक कॉल कर."
"ओके."
"हॅलो नीरजा"
"हॅलो बोला जय, काही झालेय का?"
"म्हटले तर झालेय."
"म्हणजे?"
"नीरजा अगं मला राहीने आपण होऊन फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली."
"बरं, मग?"
"ती माझ्याशी आपण होऊन बोलायला आली."
"ओके."
"तिने मला 'हृदयांशु' म्हणून संबोधले."
"क्काय?"
"हो. तिने स्वतः मला घरी बोलावले. आणि मला दारात बघून तिला आश्चर्य वाटले."
" "
"तिने जे खायला बनवले होते ते माझ्या आवडीचे नव्हते."
"कसे शक्य आहे?"
"आणि पूर्ण वेळ ती खूप घाबरून बसली होती. हात थरथर कापत होते तिचे. घामाने भिजली होती ती. दार  मिनिटाला पाणी पीत होती."
"हे भलतेच आहे."
"नीरजा तिचा नवरा कसा आहे ग?"
"ठीक आहे."
"म्हणजे तुमचे काय बोलणे त्याच्याबद्दल? ती काय सांगते? मला जरा शंका येतेय अगं."
"खरेतर आम्ही दोघी काही बोललोच नाहीये. ना तिच्या नवर्याबद्दल ना त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल. आता तुम्ही म्हणताय ना जय, मलाही शंका वाटतेय. काहीतरी चुकतेय हो. मी तिच्या आईशी बोलते."
"नाही नको. तिच्या घराचे काळजी करत बसतील. मी तिच्याशीच बोलायला कसे मिळेल ते बघतो. तिच्याशी बोललो तर सगळे नेट समजेल."
"माझी काही मदत?"
"हो. मला सांग तिचे लग्न कसे झाले? त्याच्याशी भेट कशी झाली? त्याच्याबद्दल तुला काय काय माहिती आहे? सगळं सांग मला."
"सांगते"

Thursday, September 27, 2018

हृदयांशु || भाग - ०३

हृदयांशुच्या आयुष्यातला अत्यंत सुंदर काळ. आणि का नसावा? पंचविशीतला हृदयांशु. Graduation पूर्ण झाल्यावर गेली दोन-अडीच वर्षे नोकरी करणारा. म्हणजे थोडक्यात लग्नाच्या बाजारातील एक उत्तम उमेदवार. दिसायला राजबिंडा. ऑफिसमध्ये सगळे त्याला जय म्हणूनच हाक मारायचे. 
"लग्नाचे वय झालेय आता तुझे. छानशी पोरगी पटव आता. इतक्या पोरी तुझ्यासाठी जीव टाकत असतात आणि तू. असा कसा रे तू?"
"हो लग्न करायचे आहेच. मुली मागे लागतात तेही कबूल. पण त्यातली कोणतीच मला भावत नाही हो. काय करू? म्हणजे अशी एकही पोरगी आजवर मनात ठसली नाही हो."
हे आणि असे संवाद हृदयांशु घरच्यांसोबत आणि मित्रांसोबत सतत चालत असत. 
आज ऑफिसमध्ये एक Interview होता. Marketing Department ला एक Data Entry साठी Post open होती. आणि तो Interview घेणारा Head आज सुट्टीवर होता. त्यामुळे HR असणाऱ्या निहारने ही जबाबदारी हृदयांशुवर टाकली होती. Interview घ्यायला जाताना त्याने सहज Reception Area मध्ये नजर फिरवली. तिथे दोघी तिघी मुली बसल्या होत्या. सगळ्या आपापल्या फाइल्स घेऊन अस्वस्थपणे आपल्याला बोलावण्याची वाट बघत बसलेल्या. हृदयांशुने एकेक करून Interview घ्यायला सुरुवात केली. पहिली मुलगी आत आली. बऱ्यापैकी Confident वाटत होती. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तिने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यातली बरीचशी चुकली पण तरीही तिचा आत्मविश्वास तसूभरही ढळला नव्हता. 
'वाह्! हे जमायला पाहिजे राव आपल्याला.' हृदयांशुने तिला पुढच्या मुलीला आत पाठवायला सांगितले. दुसरी आलेली मुलगी ठीक होती. भरपूर मेकअप करून आली होती आणि तिचा Perfume..त्याने तर हृदयांशुला सटासट शिंका यायला लागल्या. जुजबी प्रश्न विचारून त्याने तिला जवळपास हाकललीच. आणि मग जेव्हा तिसरी मुलगी आत अली तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला. एकदम शांत आणि सोज्वळ चेहेरा. जणू काही गौराईच. 'साधासा चुडीदार, केस फार लांब नाहीत तरीही त्याची वेणी घातलीय. कानात काही नाही, हातात काही नाही. कपाळावर छोटीशी टिकली. बस्स. पण तरीही किती छान दिसतेय ही मुलगी.' 
तिचा Interview मात्र हृदयांशुने अगदी शिस्तीत घ्यायला सुरुवात केली. म्हणजे अगदी नाव काय? पासून सुरुवात झाली. आणि हे निहारच्या लगेच लक्षात आले. 
"नाव काय तुमचे?"
"राही" "राही देशपांडे"
"आपण पुण्याच्याच आहेत का?"
"हो. मी पुण्याचेच आहे."
"कुठे झाले शिक्षण?"
"सरदार परशुरामभाऊ कॉलेज"
मग थोडे कामासंबंधात प्रश्न विचारायला सुरुवात केली त्याने. जे येत होते त्याची व्यवस्थित उत्तरे दिली राहीने. पण जे येत नव्हते ते तिने स्पष्ट सांगितले 'मला माहिती नाहीये/ मला माहिती आहे पण आत्ता आठवत नाहीये मला'
"मग आणि छंद काय तुमचे?"
"मला लिहायला आणि वाचायला आवडते, पेंटींग करते मी."
"अच्छा म्हणजे तुम्ही लेखिका आहेत तर?"
"नाही मी वाचते आणि त्यातले जे आवडते ते स्वहस्ते उतरून काढते."
"अरे वाह्! छान"
"बाकीचे प्रश्न HR सर विचारतील."

"हॅलो मिस राही, तर तुम्ही पुण्याच्या SP College मधून डिग्री घेतली तर."
"नाही. डिग्री मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतली. मी शिक्षण सरदार परशुरामभाऊ कॉलेजमधून घेतले."
"बर. ठीके मग बाकी प्रश्न सरांनी विचारले आहेतच तर कळवतो आम्ही तुम्हाला. तुमचा नंबर आहेच आमच्याकडे. आम्ही करू तुम्हाला कॉन्टॅक्ट. थँक यु ."
"थँक यु सर. बाय सर"
"बाय राही"
"जय लेका गेली ती बाहेर. काय चालू होता हे साहेब?" निहार वदे 
"कुठे काय काहीच तर नाही" नजर चोरत हृदयांशुने उत्तर दिले 
"जय  लेका मला फसवू नकोस हा तू . खरं सांग, आवडली ना ती तुला?"
"निहार, मी जातो आता मला पुष्कळ काम आहे. बाय." निहारच्या अश्या डायरेक्ट अटॅकवर तिथून काढता पाय घेण्याशिवाय हृदयांशुला दुसरा पर्यायच नव्हता. 
हृदयांशु आज जाम खुश होता. आज राही ऑफिस मध्ये जॉईन होणार होती. 
आज सक्काळी जिम मध्ये साहेबांनी बायसेप्स मारले होते त्यामुळे भरीव दंड/बायसेप्स/डोले उठून दिसतील असा मस्त डार्क मरून कलरचा शर्ट आणि Black Trouser. ऑफिसमध्ये गेल्यावर त्याचे वेलकम राहीच्या गोड अश्या स्मितहास्याने झाले. खूप छान वाटले हृदयांशुला. 'खरी गुड मॉर्निंग झाली आज.' 
क्युबिकलमध्ये गेल्या गेल्या  त्याला निहारने त्याच्या केबिन मध्ये बोलावले. 
"गुड मॉर्निंग जय"
"व्हेरी गुड मॉर्निंग निहार. आज सकाळीच आठवण काढलीस?"
"जय अखेर आज तो दिवस उजाडला आहे ज्याची तू आतुरतेने वाट पाहत होतास."
" " हृदयांशुच्या पोटात गोड़ गुलाबी फुलपाखरे उडत होती. 
"जय, तू आजपासून आपल्या Companyचा Business Analyst म्हणून काम बघणार आहेस. कालच सरांनी मेल केलीये. तुलापण पाठवतो डिटेल्स .इथून पुढे तुझे रिपोर्टींग मिहीर सरांना असेल."
"म्हणजे आता माझी बसण्याची जागा...  बदलणार?"
"जय, अरे तुला तेच हवे होते ना? का रे नाही का करायचे तुला हे काम?"
"नाही तसे नाही. ठीक आहे. आता काय बदलतो जागा. कुठे बसायचे मी आजपासून? "
'एका डिपार्टमेंट मध्ये नसलो म्हणून काय झाले? Company तर एकाच आहे ना आपले'
"बस काय भावा, लेका तुझी जागा तीच ठेवलीये मी. मला माहितीये तुला नाही बदलायची ती जागा आता."
"Thanks यार Thank You so much निहार."
"जा आता, आणि हा एक काम कर ना, जाता जाता Reception Area मध्ये ती मुलगी बसलेय तिला जरा इकडे पाठवतोस का? जरा Guide कर ना तिला प्लीज."
"अरे नक्की. thanks again"
राही आणि हृदयांशु बरोबर आमने-सामनेच बसत होते आणि दोघांच्यावर लक्ष ठेऊन होत्या त्या मनीषा मॅडम. 
हळू हळू राही ऑफिस मध्ये रुळत होती. तसे राही आणि हृदयांशु मध्ये पण आईस ब्रेक होत होता. जरा अडले काही कि ती तिच्या 'सरांना' विचारायची. राही आणि हृदयांशुने आता नंबर पण एक्सचेंज केले होते. चॅटिंग वगैरे सुरु होतेच. पण फार काही गाडी पुढे सरकत नव्हती. ती त्याला नवीन काय शिकता येईल त्याबद्दलच विचारायची आणि तो भरभरून माहिती द्यायचा. तो तिला नवीन काय वाचले का? पेंटिंग वगैरे सुरु आहे का विचारायचा आणि ती जेव्हढ्यास तेव्हढे उत्तरे द्यायची. 
'कशी सरकायचे गाडी पुढे? रोज नुसते गुड नाईट बोलून पुढे कसे जाणार गाडी?' हृदयांशु रोज रात्री झोपताना विचार करायचा. 'काय करावे बरे? ती ऑफिस मध्ये बोलत राहिली तर बऱ्याच गोष्टी काळातील तिच्याबद्दल. तिच्या आवडी-निवडी काळातील'
त्यातच एक बातमी आली. त्यांच्या मिहीर सरांना अर्थात Company चे Owner मिहीर सरदेसाई ह्यांना Youngest Businessman of the Year असा किताब मिळाला होता. आणि त्याची Ceremony आणि Celebration चेन्नईला असणार होते. सरांनी त्यांच्या सगळ्या टीमला तिकडे आमंत्रण दिले होते. काही Juniors ज्यांना त्यांच्या खाजगी कारणांमुळे जाणे शक्य नव्हते अश्यांवर जबाबदारी टाकून सर्वांचे चेन्नईला जायचे ठरले होते. जास्ती दिवस राहणे शक्य नसल्याने सर्वांसाठी Flight Bookings करण्यात आले. चेन्नईला छानश्या Beach Resort वर सगळ्यांसाठी Rooms Book केल्या होत्या. पहाटे 4 वाजताची Flight होती आणि सर्वांनी पहाटे २ वाजेपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. 
"मनीषामॅडम मी Cab Book करतोय. तुम्हाला  करू का Pick?"
"हं. चालेल कर. किती वाजता निघावे लागेल रे?"
"अं .... बघा ४ची फ्लाईट आहे तर २ला रिपोर्ट करावे लागेल. ट्रॅफिकचा विचार करता .... आपल्याला साधारण अकरा साडेअकराच्या दरम्यान निघावे लागेल."
"बापरे! एवढ्या रात्री?"
 आपले गोल डोळे आणखीच विस्फारून चित्कारणाऱ्या राहीकडे हृदयांशु एकटक पाहतच राहिला. 
"हो अगं आपल्याला  लागणार नाही का? काय गं तू कशी येणार आहेस?"
"मॅडम अहो लक्षातच  माझ्या आपल्याला एवढ्या रात्री निघावे लागेल ते. आता? कशी येऊ मी?"
"जय आपणच घेऊन जाऊयात हिला. एकटीच कशी येणार ही? काय गं कुठे राहतेस तू?"
"मी धायरीत राहते."
"ठीक. जय असे कर. तू  राहीला घेऊनच माझ्याकडे ये."
"ठीक आहे. त्यानुसार मी कॅबला वेळ देतो."
ठरलेल्या वेळेला राही हृदयांशुची  घराबाहेर येऊन थांबली होती. सुटसुटीत असा साधासा चुडीदार  तिने.   तरीही सुंदर दिसत होती. हृदयांशुची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती. हृदयांशुच्या लक्षात न आल्याने त्याने कॅब शेअरिंगमध्ये बुक केली होती. राहीनंतर कॅबचा  पीक-अप  होता. एका मुलाला घेऊन मग पुढे मनीषामॅडमकडे जायचे होते. तो मुलगा राहीशेजारी बसल्यावर नकळतच हृदयांशुने हलकेच राहीला आपल्याबाजूला ओढले. राहीला त्याचे असे प्रोटेक्टिव्ह असणे सुखावून गेले. मनीषामॅडमना घेऊन कॅब विमानतळावर पोचली. सर्व सोपस्कार आटोपून सगळे जेव्हा विमानात बसले तेव्हा राहीच्या शेजारी मनीषामॅडम, आणि त्यांच्या शेजारी हृदयांशु. ती पहिल्यांदा विमानात बसत असल्याने त्या  तिला खिडकी कडेला बसायला दिले. तिलाही सुरुवातीला मज्जा वाटली पण मग खिडकीतून खाली बघताक्षणीच डोके गरगरले. मग तिने मॅडमना रिक्वेस्ट केली आणि दोघांच्या मध्ये बसली. जसे विमान सुरु झाले तसे राहीच्या पोटात गोळा  आला. तिने हृदयांशुचा हात घट्ट धरून ठेवला.  तिला असे घाबरलेले पाहून तिला धीर देण्यासाठी हृदयांशुने तिच्या हातावर आपला हात हलकेच दाबला. आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. 
"ए तू किशोर कुमारची गाणी ऐकतेस का ग?"
"किशोर कुमार? त्याचा काय संबंध संबंध?"
"अगं सांग तरी."
"हो ऐकते तर. किशोर कुमारची गाणी कोण नाही ऐकत?"
"आहे माझा एक मित्र. तो नाही ऐकत किशोर कुमार. ते जाऊदेत. तुझे फेवरेट कोणते?"
"अगं बाई, असं एकदम एकच गाणे कसे सांगणार ना?"
"सांग ना एक कोणतेही तुझे आवडते."
"किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
 किसीका दर्द मिल सके तो ले उधार 
 किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार 
 जीना इसी का नाम है"
राहीच्या ह्या उत्तरावर हृदयांशुने लगेच शीळ वाजवायला सुरुवात केली. त्याचे बघून पलीकडच्या बाजूला बसलेला निहारपण सुरु झाला. सोबत आलेले वैशाली, अंजली, अभिजित, धीरज, शिवराज सगळेच गाऊ लागले. ते बघून राहीसुद्धा जोरजोरात गाणे गाऊ लागली. तिला मनीषामॅडमनि साथ दिली. ह्या सगळ्यात राहीला कळालेच नाही विमान उंच आकाशात कधी स्थिरावले ते. 
"सर तुम्हाला कोणते गाणे आवडते?"
राहीच्या ह्या प्रश्नावर हृदयांशुने एक लिस्टच सांगितली. 
"असं नाही सर म्हणून दाखवा ना."
"अगं, काही काय अगं"
"सर प्लीज ना, निदान गुणगुणूनतरी दाखवा ना"
"अगं इथे नको प्लीज. लोकं बघतात प्लीज नको ना"
"ठीकेय पण मग चेन्नईला?"
"हो नक्की."
हळूच एकमेकांच्या कानात बोलताना दोघांनाही हे कळलेच नाही कधी निहारने त्या दोघांचे फोटो काढले. हातात हात धरलेले एकमेकांच्या अगदी जवळ आणि चेहेऱ्यावर निखळ आनंद. 
'काय सुरेख आलेत हे फोटो. निहार मित्रा आयुष्यभराचे उपकार केले आहेस तू माझ्यावर. माझे आणि राहीचे इतके सुंदर फोटो. पहिले आणि शेवटचे. राही .. माझे पहिले आणि शेवटचे प्रेम. राही अगं तब्बल ४ वर्षे आणि ५ महिन्यांनी भेटलो आपण आज. कित्ती बारीक झाली आहेस अगं तू. माझ्या ह्या हिऱ्याची चमकच हरवली आहे. काय झाले आहे तुला? तू ठीक आहेस ना ग? त्यादिवशी तुला फेसबुकवर बघितले कित्ती मस्त वाटले अगं. पण तु बोलायला आलीस आणि मला हृदयांशु म्हणालीस. तिथेच कळाले काहीतरी गडबड आहे.'

Thursday, September 20, 2018

हृदयांशु || भाग – ०२


"Hi, राही कशी आहेस?"
हृदयांशुचे हे शब्द राहीच्या कानात शिरतच नव्हते. दारात हृदयांशुला बघून राही जमिनीला खिळून राहिली. विस्फारलेल्या डोळ्यांनी हृदयांशुला बघणाऱ्या राहीचे मन पूर्णपणे Blank होते. हा इथे कसा, का, कुठून आला हे असले प्रश्न तिला त्या क्षणी नाही पडले. इतके वर्ष स्वतःला आपल्यापासून तोडलेल्या हृदयांशुला आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय हेच तिला पटत नव्हते. 
"राही" रंगाने दात ओठ खात हाक मारली तेव्हा ती एकदम भानावर आली. खरेतर थोडी दचकलीच पण सावरले तिनी स्वतःला. 
"H..Hi, Hi अंशु. ये ना आत ये. दारात का उभा. ये आत ये."
"या बसा. बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे थोडी बावरली आहे ती. राही, पाहुण्यांना पाणी दे."
कापऱ्या हातांनी पाणी देणाऱ्या राहीच्या सर्वांगाला घाम फुटला होता.  
हृदयांशुच्या नजरेतून हे सुटले नाही. 
"बस ना राही. अगं त्या पाण्याची खरी गरज तर तुला आहे. रिलॅक्स हो अगं. बैस." 
"अगं राही बैस तो एवढं म्हणतोय तर बैस तुसुद्धा."
रंगांच्या नजरेतले विकार झेलत झेलत राही सोफ्यावर बसली. वातावरणातला ताण हलका करण्यासाठी  हृदयांशुने काहीतरी जोक मारला. काय जोक केला ते राहीच्या कानापर्यंत पोचलाच नाही. किंबहुना तिचा मेंदु इतका शाॅक मध्ये होता की कोणतेच आवाज अॅक्सेप्ट करत नव्हता. प्रचंड भीती भरली होती तिच्या मनात. 
"राही तू ठीक आहेस ना?"  
"राही अगं काहितरी बोलतोय तो. लक्ष कुठे आहे तुझे?" रंगाने तिच्या दंडाला धरून तिला गदगदा हलवत रंगाने विचारले. 
"अं ... सॉरी माझं लक्ष नव्हते. तुम्ही दोघे बोलत बसा, मी काही खाण्या-पिण्याचे बघते."
तिथून उठून राही आत निघून गेली. हृदयांशु इथे कसा? ह्या प्रश्नाने बिचारी राही ग्रासून गेली होती. पुढची दमदार हाक येण्याआधी तिने बनवलेले पदार्थ प्लेट  बाहेर सर्व्ह केले आणि किचनमध्ये येऊन बसली. जरा निवांत आणि शांत वेळ मिळाला आणि मग तिचा मेंदू काम करू लागला. 
' हा अंशु इथे कसा आला? ह्याला रंगाने इथे बोलावले? पण रंगा ह्याला कसा काय ओळखतो? काय प्रकार आहे हा?'
'अंशु इथे कसा काय? त्याच्या समोर गेले तर त्याला कळेल सगळे. काय करावे बरे? मी आता माझ्या भावना त्याच्या पासून  ठेवू शकत नाही'
'पण अजूनही इतक्या वर्षांनीदेखील अंशु तसाच आणि तितकाच handsome दिसतोय नाही. त्याचे ते डोळे. वाह! असे वाटते कि पाहतच बसावे त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून. त्याचे नाक. नेहेमी complex  देते मला, ह्याचे नाक. अरे ह्याने मिशी वाढवलीये. Militaryman सारखी. मला आवडते आर्मीवाल्यांच्यासारखी मिशी. त्यानेच तर अंशू जास्ती handsome दिसायला लागलाय.'

' पण अंशु आलाय बरंच झालं. कदाचित देवानेच त्याची आणि रंगाची कुठेतरी भेट घालून दिली असावी. माझ्यासाठीच देवांनी रंगाला पाठवले असणार. बाप्पा थँक यु बाप्पा. आता अंशूच्या येण्याचा मी योग्य वापर करून घ्यायला हवा.'
"राही अगं हा निघातो म्हणतोय." रंगाचा आवाज ऐकला की राहीला धडकीच भरत होती. फक्त आजच नाही कायमच त्याचा आवाज ऐकला की राही अशीच थरथर कापत असे. आत्ताही हे असेच झाले. रंगाने हाक मारल्याक्षणी राही अशीच थरथर कापायला लागली. अशीच थरथरत स्वतःवर कसाबसा ताबा मिळवत राही हॉलमध्ये आली. हृदयांशुला व्यवस्थित हसून निरोप राही म्हणाली "येत रहा अधूनमधून" 'मला भेटायला' हे शब्द जरी ती तोंडातल्या तोंडात बोलली तरी हृदयांशुने ते ऐकलेच. कसा नाही ऐकणार राहीला त्याची गरज आहे आणि त्याच्यापर्यंत तिची हाक पोचणार नाही असे कधी व्हायचे नाही. 
राहीच्या घरातून बाहेर पडल्यावर हृदयांशुची खात्रीच पटली की राही खूप मोठ्या संकटात अडकलेली आहे. फेसबुकवर आपल्याशी बोलणारी व्यक्ती ही राही नसून दुसरेच कुणीतरी आहे हे जेव्हा राहीच्या आयडी वरून 'हृदयांशु' अशी साद आली तेव्हाच कळाले होते. 
'आता कसेही करून राहीशी बोलायला हवे पण तिचा नवरा. त्याने तर आज तिला त्याच्याशी बोलूच  नाही. काय करावे?'
विचार करत करत हृदयांशु त्याच्या घरी पोचलादेखील. त्याने ठरवले तेच करायचे जे तो राहीकडून शिकला होता. 
'मेडिटेशन. meditation is the solution for all. Just  sit and relax. concentrate on yourself. try to hear your inner voice. Inner peace. Try to get inner peace.' राहीचे हे वाक्य हृदयांशु कधीच  शकला नव्हता. हे वाक्यच काय राहीचा एक अन एक शब्द त्याच्या लक्षात होता. शकणार होता तो ते मंतरलेले दिवस. सोनेरी, मखमली, मोरपिशी, गुलाबी दिवस होते ते. हृदयांशुच्या आयुष्यातला अत्यंत सुंदर काळ होता तो. 

Saturday, August 4, 2018

हृदयांशु || भाग - ०१

"ए ऐक गं, उद्या तुझा एक मित्र येणारे तुला भेटायला. सकाळी ठीक १० वाजता येईल तो. ब्रेकफास्टला येणारे पण आपण त्याला जेवायलाही थांबवून घेऊ. तयारीला लाग."
"कोण मित्र?" हे राहीच्या तोंडून आलेले शब्द ऐकायला रंगा तिथे थांबलाच नव्हता. तो कधीचाच त्याच्या त्याच्या बेडरूममध्ये जाऊन झोपला होता.
'हं. कोण मित्र येणारेय माझा? आणि माझ्या कोणत्याही मित्राबद्दल ह्याला कसे माहिती?'
ह्याच विचारात थकल्या भागल्या राहीला झोप लागली.
सकाळी लवकर उठली. स्वतःचे आवरून ती रंगा उठायची वाट बघत बसली. रंगा उठल्यावर त्याच्यासाठी चहा केला.
"आज कोण येणारेत आपल्याकडे?" भीतीमुळे राहीच्या तोंडून आवाज नीट फुटत नव्हता. 
"कोण काय कोण? काल सांगितलं तेव्हा लक्ष कुठे होतं? तुझा मित्र येणारे" पराकोटीच्या तुसडेपणानी रंगा ओरडला.
"ख..ख..खायला क क क्काय करू?" घाबरलेल्या राहीला नीट बोलताही येत नव्हते.
"कांदेपोहे कर. आणि भज्या तळ. आणि हां गोड .. शिरा कर."
"बर."
पोह्यासाठी भरपूर कांदा चिरुन ठेवला. 
'कित्ती दिवसात असे मस्त कांदेपोहे केलेच नाहीयेत आपण. शीत्ला काकी काय मस्त पोहे बनवते. ती म्हणते मन लावून केलं की स्वयंपाक रुचकर होतो. आज आपणही मन लावून करु स्वयंपाक. आपल्यासाठी म्हणून करु. आता भज्यांसाठी कांदा चिरावा. खेकडा भजी करुयात. आज्जीसारख्या. मस्त लांबच लांब कांदा चिरायचा. एकसारख्या पण कमी जाडीचा. त्या आपल्या अंदाजानी तिखट, मीठ आणि चिमुटभर साखर घालायची. आणि द्यायचे ठेवून बाजूला. आता ह्या कांद्याला पाणी सुटेल. तोपर्यंत शिऱ्याची तयारी करुन घेऊ. पहिले एका कढईत तूप घ्यायचे. त्यावर दोन वाटी रवा घेतलाय आपण तो भाजून घ्यायचा. छान गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजायचा.' 
नाष्ट्याची तयारी करता करता राही आपला लहानपणीचा खेळ केव्हा खेळू लागली कळालेच नाही. ती आणि नीरजा लहानपणी उगीचच खाना-खजाना खेळत असंत. 
" काय हे? अजून तू पोहे केले नाहीएस? भज्यांचा पत्ता नाहीये. शिरा व्हायचाय? काय चाल्लंय?"
रंगाचा हा असा ओरडल्यानी राही एकदम दचकली. 
"मी .. ते.. तयारी.. तयारी करतेय." 
"अजूनी तयारीच का? कधी व्हायचं हे सगळं? वेळेवर सगळं तयार नाही ना झालं तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही. काय?"
"हो"
"आणि जरा बरी साडी नेस. फार मेकअप नकोय."
"हो"
"पुढच्या अर्ध्या तासात आवरून तयार असली पाहिजेस." 
" "
"काय सांगतोय मी? कळतेय का काही??"
"हो ... हो... मी... मी आवरते."
रंगा तिथून गेल्यावर एक ग्लासभर पाणी गटागटा प्यायली राही. आताशा त्याच्या ह्या अश्या आरडा ओरडीचे तिला काहीच वाटत नव्हते. सुरुवातीला ती ढसढसा रडत असे. पण आता तीला ह्या साऱ्याची सवय झालेली. मनातले विचार झटकून तिनी पटापटा पोह्यासाठी फोडणी करुन ठेवली. तळणीसाठी तेल तापत ठेवले आणि शिरा वाफवायला ठेवला. आणि ती पटकन् स्वतःचे आवरायला पळाली. 
'काय घालावे बरे? चुडीदार की साडी?' असा विचार करताना जीभ चावली.
'मूर्ख. मंद. अक्कलशून्य मुली. विसरलीस ना? काय सांगितलेय तुला? साडी नेस. काय नेस? साडी. कुठली नेस ते का सांगितला नाही नालायकानी? xxxxx'
राहीने छानशी मरुन रंगाची रंगाची सिल्कची साडी काढली बॅगमधून. ही साडी. बाबांनी घेतलेली. लग्नाच्यावेळी साखरपुड्याला नेसायसाठी. 
"अगं, ती साडी बघ शारदा ग्रीन कलरची. ओ दाखवा हो ती साडी. ती नाही हो ती त्याच्या खालची. नाही नाही ती वरची. ओ ती नव्हे. शी काय बाई ही अशी साडी घेऊ का आम्ही? ती हो हा त्याच्या वरची ती दुसरी. हा हीच ती. बघ गं राही. ही साडी." नमूमावशी उत्साहानी दाखवत होती.
"नाही नको. मला नाही आवडला हा कलर."
"अगं मग ही बघ. मस्त गुलबक्षी रंगाची." इति सविता काकू.
"नको हा वहिनी. त्याचे काठ बघा. काळेयत." शुभदा काकी म्हणाली.
"आपल्या लेकीच्या लग्नात काळं नको बाई."
"राही" आईचा खास ठेवणीतला आवाज. "ही बघ गं आवडतीय का? गडद हिरव्या रंगाची. काठ छान आमरशी रंगाचे आहेत बघ."
"नको." राहीने नाक मुरडले.
"मग ही बघ मरुन कलरची. त्याला छान गोल्डन काठ आहेत बघ." नीरजाला माहिती होते राहीचा फेवरेट कलर आहे मरुन.
"अं. नको हीपण नको"
असे करत राहीसमोर साड्यांचा हा ढीग जमा झाला. 
शेवटी ज्या ज्या कोणत्या आधी दाखवल्या होत्या त्याच खरेदी करुन आले. 
"काय गं राही उगीच एव्हढा वेळ घालवलास. आधीच घ्यायच्या ना ह्या साड्या."
"अहो वहिनी, आपल्या राहीचं माहितीय की आपल्याला. नेहेमी कन्फ्युज्ड असते. आधी नाही म्हणणार मग हो म्हणणार."
"खाण्याच्या बाबतीतही असेच. मानानी खाणार नाही."
"कसं व्हायचं गं येडु तुझं??"
एक साडी बघून राही आठवणींमध्ये रमून गेली.
"काय आवरलं का नाही?" खालून आवाज आला तशी ती भानावर आली. 
पटकन साडी नेसली. लांबसडक केसांचा मानेवर अंबाडा घातला. गळ्यात मंगळसूत्र होतेच. कानात आज्जीच्या कुड्या. सैल होणारे ब्लाऊज तिनी आतून सेफ्टीपीन लावून घातलेले. 
पटकन खाली आली. रंगानी तिला बघून न बघितल्यासारखे केले. ती स्वयंपाकघरात गेली. प्लेट्स घेऊन ठेवल्या. घरात एक छान ठेवणीतला असावा अश्या सहा कप-बश्यांचा सेट होता. तो काढून ओल्या कपड्याने पुसून ठेवल्या. तेव्हढ्यात बेल वाजली आणि राहीच्या छातीत धडधडायला लागले. 
'कोण मित्र असेल?'
ती चटकन बाहेर जायला वळली. पण रंगा परत ओरडायचा म्हणून ती तिथेच थबकली. 
रंगानी दार उघडून आलेल्या पाहुण्याचे हसतमुखाने स्वागत केले. 
"अगं, ते आले बघ."
रंगाची हाक ऐकू आली, तशी राहीने साडीवरुन, चेहेऱ्यावरुन, केसावरुन हात फिरवला.
'दारात कोण मित्र उभा असेल?' तिची उत्सुकता शिगेला पोचली.
बाहेरच्या खोलीत जाऊन तिने दारातल्या 'त्या' मित्राला बघितलं आणि ती तिथेच थिजून उभी राहीली.
"Hi राही! कशी आहेस?"
दारात उभ्या हृदयांशुला पाहून राही एकदम आश्चर्यचकीत झाली.


©ज्ञानदा अजित कुलकर्णी

Thursday, June 9, 2011

पाउस आणि आठवणी

पाउस आणि त्याच्या आठवणींवर आजवर इतके लोक इतक्या प्रकाराने बोलले आणि लिहिले आहेत ना....
पाउस आणि पर्यायाने पावसाळा चालू होणार म्हटले कि रेडियो आणि टेलिव्हिजन वर सगळी पाउस सदृश गाणी वाजतात. अगदी 'प्यार हुआ इकरार हुआ' पासून ते अगदी बरसो रे मेघा' पर्यंत. पण खरे सांगू मला पाउस म्हटले कि आठवते ते आमच्या शाळेत शिकवलेले 'हिरवी छाया हिरवी माया' असे काहीतरी होते ते गाणे. हे गाणे आठवण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेत जेव्हा हे गाणे शिकवले तेव्हा माझा भड्डक्क हिरव्या नाही फ्लुरोसंट हिरव्या रंगाचा ट्रान्सपरंट रेनकोट होता. आणि मी तो रेनकोट घातला कि माझ्या मैत्रिणी हे गाणे म्हणायच्या. तेव्हा राग यायचा पण आता आठवले कि हसू येते.
पाउस म्हटले कि कुणाला महाबळेश्वर, तर कुणाला सिंहगड, तर आणि कुणाला लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा आठवतो. पण मला काय आठवते सांगू? मला आठवते ते सकाळी शाळेला जायची तयारी करून बसलेली मी. शिवदत्त निवांत च्या दारात वहिनींची वाट बघत बसलेली. उगाचच दाराशी खेळ करत, तो काळभोर स्वच्छ धुतल्या सारखा काळभोर रस्ता बघत. मग कधीतरी वासुकाका ओरडायचे ' ए अंधार सोड' मग मी वर गच्चीत जाऊन बसणार. पण काम तेच काळभोर रस्ता बघत वहिनींची वाट बघायचे. मग कधीतरी वाहिनी यायच्या सगळ्या वाटेत गोळा केलेल्या पोरांचे लटांबर घेऊन आणि ओरडायच्या 'ज्ञानाsssss'. आणि मग धावत पळत काह्ली येणार दप्तर पाठीवर अडकवून शाळेत पळणार.
शाळेत आपले नवीन दप्तर मैत्रीणीना दाखवायचे, त्यांचे बघायचे. आणि मग कुणाच्या दप्तराला किती कप्पे जास्त ते पहायचे. एकमेकींच्या नवीन वह्या बघायच्या. त्यावर कुणाच्या वहिला छान चित्र आहे ते पाहायचे. आणि मग जर सारख्या असतील म्हणजे करियर, महालक्ष्मी, नवनीत, आणि मग क्लासमेट च्या वह्या असतील तर ..' ए मी सायन्स ला हे वही घालणारे तू कुठली घालणारेस? हे डिझाईन असणारी नको हं घालू' आत्ता आठवले तरी मज्जा वाटते.
पाउस म्हटले कि मला आमचे जुने, म्हणजे दुधाळी मधले घर आठवते. त्या घरासमोर एक मोट्ठे मैदान होते. दुधाळी पॅव्हेलियन. तिथे पाउस चालू झाला कि मुले फुटबॉल खेळायला यायची. म्हणजे ज्यांना फुटबॉलचा फ देखील माहित नाही तीपण यायची. पण पाउस जसा वाढेल तशी ह्या मुलांची जागा कोण घ्यायचे माहिती आहे? चक्क म्हशी. अर्थात त्या काही फुटबॉल नाही खेळायच्या. पण दिवसभर त्या पावसाच्या साचलेल्या पाण्यात बसून राहायच्या. त्या हिरव्यागार मैदानावर त्या काळ्याभोर म्हशी. तेव्हा मज्जा वाटायची खूप.
पाउस म्हटले कि कुणाला महाबळेश्वर, तर कुणाला सिंहगड, तर आणि कुणाला लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा आठवतो. पण मला काय आठवते सांगू? मला आठवते ते सकाळी शाळेला जायची तयारी करून बसलेली मी. शिवदत्त निवांत च्या दारात वहिनींची वाट बघत बसलेली. उगाचच दाराशी खेळ करत, तो काळभोर स्वच्छ धुतल्या सारखा काळभोर रस्ता बघत. मग कधीतरी वासुकाका ओरडायचे ' ए अंधार सोड' मग मी वर गच्चीत जाऊन बसणार. पण काम तेच काळभोर रस्ता बघत वहिनींची वाट बघायचे. मग कधीतरी वाहिनी यायच्या सगळ्या वाटेत गोळा केलेल्या पोरांचे लटांबर घेऊन आणि ओरडायच्या 'ज्ञानाsssss'. आणि मग धावत पळत काह्ली येणार दप्तर पाठीवर अडकवून शाळेत पळणार.
शाळेत आपले नवीन दप्तर मैत्रीणीना दाखवायचे, त्यांचे बघायचे. आणि मग कुणाच्या दप्तराला किती कप्पे जास्त ते पहायचे. एकमेकींच्या नवीन वह्या बघायच्या. त्यावर कुणाच्या वहिला छान चित्र आहे ते पाहायचे. आणि मग जर सारख्या असतील म्हणजे करियर, महालक्ष्मी, नवनीत, आणि मग क्लासमेट च्या वह्या असतील तर ..' ए मी सायन्स ला हे वही घालणारे तू कुठली घालणारेस? हे डिझाईन असणारी नको हं घालू' आत्ता आठवले तरी मज्जा वाटते.
पण कितीही पुढे जा पाण्याचे लोंढे आपले चालूच आणि गाडी कुठेही फसत नव्हती. कशी फसणार, कॉलेज छान पैकी टेकडीवर आहे ना.
त्यानंतर आठवणारा पावसाला म्हणजे, ताईला तिच्या कॉलेज मध्ये म्हणजेच के.आय.टी. मध्ये आई बाबांसोबत गाडीत बसून गेले होते. तेव्हा डोक्यात इंजिनियर होण्याचा जराही विचार नव्हता. आणि तो प्रचंड पाउस पाहिला. केव्हढा प्रचंड. रस्त्याने केव्हढे मोट्ठे लोंढे वाहत होते पाण्याचे. असे वाटले कि नाहीच थोडे पुढे गेलो न तर नक्कीच कमरे एव्हढ्या पाण्यात अडकणार.
के.आय.टी चा विषय निघाला आहे तर सांगते ह्या कॉलेज वरून पाउस अगदी अप्रतिम दिसतो आणि भासतो.
त्यानंतर मी जेव्हा कॉलेज जॉईन केले ना त्यावर्षीचा तर प्रत्येक पाउस माझ्या आठवणीत आहे. त्यातील दोन सांगते.
पहिल्यांदाच मी तिची गाडी घेऊन कॉलेज ला गेले येताना छानपैकी पाउस लागला. आधी वर्णन केल्यासारखा मस्त. आणि मस्तपैकी माझी गाडी बंद पडली. बर माझी कुणाशी फारशी ओळखही नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीच. कॉलेज सुटले होते खूप मुले जात होती पण एक्कानेही मदत केली नाही. फार वाईट वाटले. कॉलेज जवळ होते म्हणजे जर गाडी ढकलत न्यावी लागली तर तब्बल ६-७ किलोमीटर ढकलावी लागणार तेही भर पावसात. पण सुदैवाने दोन मित्र (त्यांच्याशी माझी नंतर मैत्री झाली तेव्हा नव्हती) थांबले त्यांनी गाडी चालू करून दिली. इतकेच नाही तर बाईक वर असूनही माझ्या खतरा स्पिरिटच्या मागे थांबले. का तर गाडी परत बंद पडली तर मदत करता यावी म्हणून.
त्यानंतर चा पाउस फारच वाईट होता. तशीच परिस्थिती होती. भयाण पाउस आधीपेक्षाही भयानक. गाडी बंद पडली. कुणीच थांबेना. मी पावसात भिजत किक मारत होते. माझी मैत्रीण देखील प्रयत्न करत होती पण यशच नव्हते. तशीच उतारावरून ढकलत कशीबशी खाली उतरवली पण पुढे काय? तेव्हढ्यात पुन्हा एकदा एका मुलगा थांबला. त्यानेही खूप किक मारल्या पण शून्य. गाडी चालूच होत नव्हती. त्याला काय वाटले काय माहित, त्याने अचानक बटन मारले आणि गाडी चालू झाली.
पण माझे दुर्दैव आणि थोड्या अंतराने गाडी परत बंद पडली. पण तोवर आम्ही निर्मनुष्य रस्त्यावरून मानासालालेल्या रस्त्याला लागलो होतो. तिथेच एका घरात गाडी लावली आणि मी मैत्रिणीच्या घरी गेले. तिथे वडिलांचा फोन कि माझे काका वारले म्हणून. मग मी ताबडतोब तेथून निघाले पण मला एकही रिक्षा मिळेना निम्मा रस्ता चालल्यावर मला रिक्षा मिळाली. तो पाउस मी कधीच विसरू शकणार नाही.
त्यानंतर अनेक पावसाळे आले आणि गेले. त्या प्रत्येकाच्या स्वत:च्या अश्या वेगळ्या आठवणी आहेत. तश्या त्या प्रत्येकाच्या असतात.
पाउस म्हटले कि आठवणी, कविता, गाणी ह्यांचा नुसता हलकल्लोळ असतो नाही का?

Wednesday, June 8, 2011

मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट

मुक्तांगण काय आहे हे मला माहित नव्हते. खुपते तिथे गुप्ते मध्ये अनिल अवचट आले होते एका भागात तो भाग मी पहिला आणि इतर कामात डोक्यातून गेलादेखील. पण सुट्टी चालू झाली आणि काहीतरी नवीन छान वाचावे म्हणून सगळी पुस्तके धुंडाळली तेव्हा हे पुस्तक हातात पडले. समकालीन प्रकाशनाचे. युनिक फीचर्स ची बरीच पुस्तके खरेदी केली त्यातले हे एक. पुस्तक पहिले आणि म्हटले बघू आहे तरी काय. आणि जेव्हा प्रस्तावना वाचली तेव्हाच ठरवले कि हे अजब आहे आणि ते वाचलेच पाहिजे. आणि जसजशी मी वाचत गेले मी आश्चर्य चकित झाले कि हे शक्य आहे. मी कधी कुणा व्यसनाधीन माणसाला पाहिले नव्हते. पण कधीमधी रस्त्यात बाजूला वाकडी तिकडी पडलेली माणसे पहिली आहेत. कधीच मी त्या लोकांचा विचार केला नव्हता. पण पुस्तक वाचताना जाणवले कि आता बास शिक्षण पूर्ण झाले कि आपण तिथे निदान आठवड्यातले सुट्टीचे दिवस तरी जायचेच.
पण पुस्तक जसजसे पुढे गेले आणि एकेठिकाणी मला जाणवले कि हे माझ्यासारख्या मुलीला कधीच शक्य नाही. ते अनिल अवचट ( बाबा ) आणि त्यांच्यासारख्या इतरांनाच शक्य.
ह्या पुस्तकाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य असे कि ते वाचताना आपण तिथे मुक्तांगण मध्ये पोहोचतोच. मी हे पुस्तक वाचताना मुक्तांगण मध्ये गेले तिथल्या 'त्या' पेशंटना देखील पाहून आले. मुक्तांगणची गोष्ट आपण वाचत नाही तर आपण ती ऐकतो आहोत हि भावना वाचणा-याच्या मनात निर्माण होणे ह्यामध्ये लेखकाचा खूप मोठा विजय आहे असे मला वाटते.
एखादी व्यक्ती जर एकच गोष्ट वारंवार करत असेल तर आपण चिडतो, वैतागतो, आदळआपट करतो. पण जेव्हा आपण समजावलेला, आपले ऐकून काही काल शांत, निवांत आयुष्य जगणारा माणूस पुन्हा त्या व्यसनाच्या काळ्या डोहात जातो, बुडतो तेव्हा त्या माणसाने किती चिडावे? पण मुक्तांगणचा बाबा, तिथल्या प्रत्येक मुलाचा बाबा असे काही करत नाही तो शांत राहतो. त्या मित्राकडून वचन घेतो पुन्हा असे न करण्याचे आणि बाबा मागतो म्हटल्यावर तो मित्र देखील वचन देतो. आणि बहुतेक बाबाला दिलेला शब्द पाळतात. खरेच बाबा तुमच्या कार्याला सलाम.
बाबा म्हणतो, ' ह्या सा-याचे credit सुनंदाचे आहे. तिने चालू केले ते आणि तसेच पुढे नेण्याचे काम मी केले.' सुनंदा म्हणजे बाबांची पत्नी. डॉ. सुनंदा (अनिता) अवचट. सा-या मुक्तांगणच्या मॅडम अहं लाडक्या मॅडम. पेशंट इतर कुणाचेही नाही ऐकले तरी मॅडमचे नक्की ऐकणार तशी हातोटीच होती मॅडमची. मुक्तांगण आपल्या स्वत:च्या नवीन इमारती मध्ये हलत असतानाच कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यावेळेपर्यंत त्यांना एवढे यश आले होते कि त्या गेल्या नंतर दु:खाचा एवढा अतिरेक होऊनही त्यांचा एकही पेशंट परत व्यसनं कडे नाही वळला. मॅडमनी केवळ पेशंटना व्यसनमुक्तच नाही तर एक चांगला माणूस देखील बनवले. किंबहुना मुक्तांगण चालू करताना हेच ध्येय होते त्यांचे कि प्रत्येक व्यसनाधीन माणसाला एक चांगला जबाबदार नागरिक बनवायचे. आणि ते काही अंशी पूर्णही झाले.
मुक्तांगणची गोष्ट वाचल्याने मी एक गोष्ट शिकले की स्वत:वर, स्वत:च्या रागावर संयम ठेवायचा. निदान तसा प्रयत्न तरी करायचा कधीनाकाधी सफल होऊच ना. आणि जर पुस्तक वाचणारा प्रत्येक जन हे करू शकला तर जगात शांतता का नाही येणार. तेव्हा जरूर वाचावे असे आहे मुक्तांगणची गोष्ट.